Tuesday, 27 February 2024

आठवणीतील दरवळ

विषय- आठवणीतला दरवळ

8 मार्च 2021 आंतरराष्ट्रीय महिला दिन..मजरेवाडी येथे संपन्न झाला.. कार्यक्रमात मला मार्गदर्शन करायला येण्यासाठी विद्यार्थीनींच्या पालकांचा फोन आला.मला माझ्या विद्यार्थीनींनी बोलावले होते.पण वेळ संध्याकाळी उशिरा असल्याने मी जायचे टाळत होते,पण त्यांचा आग्रह मला मोडवता आला नाही.ते म्हणत होते,"मॅडम काहीपण करा पण कार्यक्रमाला याच,तुमच्या विद्यार्थीनींचे कौतुक करायला तरी या " ही मात्रा लागू पडली.मी होकार दिला व त्यांना म्हणाले," कार्यक्रम लवकरात लवकर संपवा,कारण माझी मुलगी आली आहे माहेरला,तिच्याबरोबर मला वेळ घालवायचा आहे." त्यांनी होकार दिला म्हणून मी आईला बरोबर घेऊन तिथे बरोबर वेळेत पोहचले.विद्यार्थीनीने आदराने स्वागत केले.बाकी विद्यार्थीनींचे मातापालकसुद्धा आले,"काय  मॅडम,कसं हाय? सगळं बरं हाय ना? " आस्थेने चौकशी करु लागल्या.त्यांच्या नजरेतील कौतुक व प्रेम सर्व काही सांगून गेले.कार्यक्रमाची चौकशी केली असता समजले की, गेले दोन दिवस विविध स्पर्धा घेतल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण व माझे मार्गदर्शन होते.आगत- स्वागतानंतर कार्यक्रम सुरू झाला.स्टेज वगैरे काही नव्हते.जमिनीवर टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या.समोर सर्व गटातील स्त्रिया,युवती,लहान मुली होत्या.सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने मी येणार म्हणून हजर होत्या.सर्वजण आपुलकीने चौकशी करत होत्या, " मॅडम,कशा आहात?,कीती दिवसांनी भेटलात..आम्हाला खूप आनंद झाला बघा तुम्हाला भेटून.मुलगी कशी आहे?कुठे आहे?मुलगा काय करतो? " नाना प्रश्न.... सर्वांना मी उत्तरे देत होते.," सर्व छान आहे, तुमचं कसं काय चाललयं? काय करताय सध्या सगळ्या? " यावर सर्वांनी माहिती सांगीतली.त्या पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद व समाधान व माझ्याबद्दलचा आदरभाव दिसला ते पाहून मी कृतकृत्य झाले.एका शिक्षकाला आणि दुसरे काय पाहिजे...?  शाळेत तर सर्व आदर करतात पण शाळा सोडून गेल्यानंतर शिक्षकांच्या बद्दलचा आदर टिकणे हे आज दुर्मिळ झाले आहे. पण मला ते पहायला मिळाले. शिवाय दुसरा आनंदाचा क्षण असा की, कार्यक्रमाचे सर्व नियोजन माझ्या विद्यार्थीनींनी केले होते.त्या विद्यार्थीनी जेंव्हा शाळेत होत्या त्यावेळी मी सांस्कृतिक विभाग प्रमुख असल्याने सर्व नियोजन माझ्याकडेच असायचे.हे सर्व त्यांनी अतिशय बारकाईने निरीक्षण केले होते हे आजच्या कार्यक्रमात मला दिसून आले. आज मला वेगळेच समाधान मिळाले.विद्यार्थ्यांची निरिक्षण शक्ती,त्यांनी माझे केलेले अनुकरण मला दिसून आले .मला खूप आनंद झाला.मी एक शिक्षिका म्हणून यशस्वी झाले असे मला वाटले.विद्यार्थीनींनी माझ्याबद्दल, शाळेबद्दल आपले विचार प्रकट केले,मला भरुन आले.कार्यक्रमाला आले नसते तर हे मला बघायला मिळाले नसते. सात ते आठ वाजेपर्यंत फक्त थांबणार असे सांगून मी आले होते पण कधी नऊ वाजले कळलेच नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसत होते.बस..मला आणखी काही नको. माझ्या विद्यार्थीनी अशाच यशस्वीपणे, धाडसाने यशाची शिखरे गाठू देते.त्यांच्याबरोबर मीही आपोआप मोठी होईन....हा आत्मविश्वास मनात ठेऊनच परत निघाले.

लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर.
9881862530

No comments:

Post a Comment